मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीसांठी महत्त्वाची बातमी! साध्या कागदावर अर्ज करा; बदलून मिळेल पुरुषांच्या नावावरील गॅस कनेक्शन, मिळतील वर्षातून ३ गॅस सिलिंडर मोफत


 सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना वर्षातून तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत दिले जात आहेत, पण अनेक पुरुषांच्या नावावर गॅस सिलिंडरचे कनेक्शन असल्याने हजारो महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळालेला नाही.

या पार्श्वभूमीवर जवळील गॅस एजन्सी किंवा जेथून गॅस घेता, त्याठिकाणी साध्या कागदावर अर्ज करून महिलेच्या नावे कनेक्शन बदलून घेता येणार आहे.


मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची शासनाची योजना आहे. त्यानुसार लाखो लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत. पण, सोलापूर जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख शिधापत्रिकाधारकांपैकी अंदाजे एक लाख जण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभापासून दूरच आहेत. त्यामागील प्रमुख कारणे म्हणजे, त्या कुटुंबातील गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावे आहे. या पार्श्वभूमीवर आता त्यांना जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरकाकडे जाऊन साध्या कागदावर अर्ज करून आधारकार्ड जोडून दिल्यास त्यांना कनेक्शनवरील नाव बदलून मिळणार आहे. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळविता येणार आहेत. सुरवातीला संबंधित लाभार्थीस संपूर्ण पैसे द्यावे लागतील, त्यानंतर काही दिवसांनी शासनाचे अनुदान त्या लाभार्थींच्या बॅंक खात्यात जमा होत आहे.


साध्या कागदावर अर्ज केला तरी चालेल


मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थी कुटुंबातील महिलेच्या नावे गॅस कनेक्शन आवश्यक आहे. जिल्ह्यातील अनेक कुटुंबातील गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावे असल्याने त्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे त्यांनी जवळील गॅस एजन्सीकडे जाऊन अर्ज करून कनेक्शन स्वत:च्या नावे करून घ्यावे. 


- संतोष सरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर


ई-पॉस मशिन बंदमुळे धान्यवाटप थांबले


प्रत्येक रेशनकार्ड दुकानातून दर महिन्याचे धान्य ई-पॉस मशिनच्या माध्यमातूनच वितरित केले जाते. धान्य वितरणात पारदर्शकता यावी या हेतूने शासनाने ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. त्यासाठी प्रत्येक रेशनकार्डधारकांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे, पण सध्या बहुतेक धान्य दुकानदारांकडील ई-पॉस मशिन बंद आहेत. सर्व्हरचा अडथळा असल्याने काही दिवसांपासून धान्य वितरण होऊ शकलेले नाही. सध्या सोलापूर जिल्ह्यातील ५० टक्के रेशनकार्डधारकांना डिसेंबरचे धान्य मिळालेले नाही. शासनाला ही तांत्रिक अडचण कळवून देखील त्यावर उपाय निघालेला नाही हे मात्र विशेष आहे.


तुळजाई न्युज

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट