गृह गेलं आणि आणखी एक खातं जाणार? शिंदेंच्या शिवसेनेला भाजपचा 'दे धक्का'
मुंबई : राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. सत्ता वाटपाचा तिढा कायम आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खाते वाटपाचा तिढा सुटला असल्याची चर्चा होती.
मात्र, हा तिढा कायम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेला गृह खातं मिळावं या मागणीवर ठाम असल्याची चर्चा होती. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृह खातं मिळणार नसून आणखी एका महत्त्वाचे खातं गमवावं लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र, सरकार स्थापन होण्यास जवळपास 13 दिवसांचा कालावधी लागला. सत्ता वाटपाच्या मुद्यावरून शपथविधीला उशीर झाला असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचाच शपथविधी झाला आहे. खाते वाटपाला चांगलाच वेळ लागत असल्याने राज्यात चर्चांना उधाण आले होते.
महायुतीचे नेते आज दिल्लीत...
आता, खाते वाटपाचा तिढा आज दिल्लीत सुटणार असल्याची दाट शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. हे तिन्ही नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असली तरी मंत्रिमंडळाची यादी आजच अंतिम होणार असल्याचे म्हटले जात आहे.
शिंदे धक्का, गृहची मागणी फेटाळली, आणखी एक खातं जाणार!
भाजपच्या वाट्यातील केवळ दोनच खाती हे मित्रपक्षांना जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महसुल आणि गृहनिर्माण ही दोनच खाती मित्रपक्षांना देण्याची भाजपची तयारी आहे. नगरविकास खातं शिवसेनेला मिळणार नाही हे जवळपास निश्चित झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. या खात्याऐवजी शिवसेनेला महसूल खातं शिवसेनेला देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे.
कोणत्या पक्षाला कोणतं खातं मिळणार?
सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीमध्ये खातं वाटप जवळपास अंतिम करण्यात आले आहे. मंत्र्यांच्या नावाच्या यादीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर खाते वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.
भाजपकडे कोणती खाती?
महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात भाजपकडे गृह, नगरविकास, विधि व कायदा, सामान्य प्रशासन, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, वने ही सर्व महत्वाची खाती भाजपकडेच राहतील अशी माहिती आहे.
शिवसेनेकडे कोणती खाती?
शिवसेनेकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम), कामगार, शालेय शिक्षण, राज्य उत्पादन शुल्क, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, परिवहन ही खाती राहण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीकडे कोणती खाती?
वित्त व नियोजन, गृहनिर्माण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, महिला आणि बालकल्याण, मदत व पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही खाती राष्ट्रवादीकडे राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा