वाल्मिक कराड याच्या समर्थकाचा संयम सुटला, स्वत:ला पेटवून घेतले, परळीत मोठा राडा....



 परळी बीड : वाल्मिक कराड याच्यावर मकोका आणि खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. मंगळवारी दिवसभर कराड कुटुंबियांनी आणि त्यांच्या समर्थकांनी परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास एका समर्थकाचा संयम सुटला.

त्याने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वत:ला पेटवून घेतले.

वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपल्याने त्याला केज न्यायालयासमोर मंगळवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र एसआयटीच्या तपास अधिकाऱ्यांनी वाल्मिकचा खून प्रकरणात सक्रीय सहभाग असल्याचा आरोप केला. खून प्रकरणात त्याची चौकशी होणे गरजेचे आहे, अटकेत असलेल्या इतर आरोपींकडून महत्त्वाची माहिती आम्हाला मिळाली आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. खून प्रकरणात एसआयटीने वाल्मिकच्या चौकशीसाठी त्याचा ताबा मागितलेला आहे. मंगळवारी सायंकाळी वाल्मिक कराडची बीड तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.


तत्पूर्वी कराडने पत्नीची पत्रकार परिषदेत सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले. सुरेश धस यांच्या सांगण्यावरून माझ्या नवऱ्यावर गुन्हे दाखल होत आहेत. तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनीही माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे कराडच्या पत्नीने म्हटले. पत्रकार परिषद सुरू असतानाच एका समर्थकाचा संयम सुटला. त्याने थेट स्वत:ला पेटवून घेत जीव देण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथील उपस्थित लोकांमध्ये पुढील प्रसंग टळला. लगोलग अॅम्ब्युलन्समधून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तो नेमका कोण समर्थक होता, त्याचे नाव काय होते, तूर्तास कळू शकले नाही.


वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर

वाल्मिक कराडवर जसाही मकोका लागला, तेव्हापासून परळीत कराड समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. मंगळवारी दुपारी परळी शहरातील दुकाने बंद करण्यात आली. समर्थकांनी परळी बंदची हाक दिल्यानंतर पुढील काही मिनिटांत परळी शहरातील बाजारपेठांत शुकशुकाट होता. कराडचे सगळे समर्थक रस्त्यावर आले. कुणी टायर जाळून कारवाईचा निषेध नोंदवला तर कुणी घोषणा देऊन चुकीची कारवाई होत असल्याचे म्हटले.


कराडच्या कुटुंबियांनीही पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. वाल्मिक कराड यांच्यावर होत असलेली कारवाई सूडाच्या भावनेतून आणि राजकारणातून होत असल्याचे कराडचे कुटुंबीय म्हणाले.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट