धनंजय मुंडे बसले वाट बघत, अजित पवारांचा ताफा बीडमध्ये, फटाक्यांची आतषबाजी अन् जंगी स्वागत....
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे गुरुवारी पहिल्यांदाच बीडमध्ये दाखल झाले आहेत. बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आल्याने भल्या सकाळीच अजित पवार बीडमध्ये दाखल झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
गुरुवारी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी अजित पवार बीडमध्ये दाखल झाले. पवारांची वाट बघत धनंजय मुंडेंच्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर ताटकळत उभं राहिवं लागलं होतं. धनंजय मुंडेंसोबत पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. पवार येताच धनंजय मुंडेंनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यापूर्वी धनंजय मुंडेंचं पालकमंत्री पद बीडचे बघितलेलं आहे. त्यांच्या स्वागतासाठी लोक थांबलेले असतायचे. पण आज परिस्थिती अगदी पालटून गेली आहे.
अजित पवार पक्ष कार्यालयामध्ये दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. १० वाजेच्या नंतर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरु होणार आहे. पक्ष कार्यालयामध्ये दाखल होताच अजित पवारांनी तालुकानिहाय आढावा बैठकीला सुरुवात केली.
बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक परिस्थिती बिघडल्याने अजित पवारांना पालकमंत्रीपद स्वतःकडे घ्यावं लागलं होतं. संतोष देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय लोक अडकल्याने ते अडचणीत सापडले आहेत. त्यामुळेच त्यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे. धनंजय मुंडेंचं पालकमंत्रीपद त्यांचा निकटवर्तीय तसेच सध्या मकोकामध्ये आरोपी असलेला वाल्मिक कराड सांभाळायचा, असा आरोप आहे.
दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला जात आहे. आमदार सुरेश धस यांनी मुंडेंना नैतिकतेचा सल्ला देत राजीनामा मागितला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मुंडेंचा राजीनामा मागितला होता. मात्र अद्यापही धनंजय मुंडे मंत्रिपदावर कायम आहेत.
दरम्यान, डीपीडीसीच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला बीडच्या आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या काळातील आणखी एक घोटाळा बाहेर काढला आहे. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना परळी तालुक्यामध्ये ७३ कोटी रुपयांचे रस्त्यांची बिलं उचलली, ती कामंसुद्धा केली नाहीत, असा आरोप केला आहे. त्याचे पुरावे ते अजित पवारांकडे देणार आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा