"असा मंत्री कधीच व्हायला नको", धनंजय मुंडेंचा आणखी एक महाघोटाळा...
मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "इफकोमध्ये महाघोटाळा झाला असून या घोटाळ्यातून धनंजय मुंडे वाचू शकत नाहीत," असा दावा त्यांनी केला.
यासोबतच त्यांनी आणखी एका नव्या घोटाळ्याचा पर्दाफाश करत "कृषी घोटाळा क्रमांक 2" समोर आणला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीचा आधार घेत मोठा घोटाळा?
दमानिया यांनी पत्रकार परिषदेत एक महत्त्वाचे पत्र उघड करत सांगितले की, या पत्रात ३० सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या निर्णयाचा उल्लेख आहे. मात्र, त्या दोन्ही बैठकीत असा कोणताही निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रात बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV) निर्मित पेटेंटेड सोलार लाइट पंप यांचा उल्लेख करत, शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी तातडीने निधी वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, धनंजय मुंडे यांनी लिहिलेल्या या पत्रावर कोणतीही तारीख नाही, असा गंभीर दावा दमानिया यांनी केला.
शासन निर्णयात २०० कोटींचा उल्लेख नाही?
अंजली दमानिया यांनी आरोप केला की, या पत्राच्या आधारे ११ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय (GR) काढण्यात आला. या शासन निर्णयात दोन गोष्टी नमूद केल्या गेल्या - एक म्हणजे, अतिरिक्त ५०० कोटी रुपयांची मागणी आणि दुसरे म्हणजे, याआधी २०० कोटी रुपयांचे बॅटरी स्प्रे आणि सोलार लाइट पंप खरेदी झाले होते, त्यांचा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही.
"मंत्रिमंडळाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, तरीही पत्रात असं सांगण्यात आलं आहे की हा प्रस्ताव आधीच मंजूर झालेला आहे. त्यामुळे हा घोटाळा उघड झाला आहे," असे दमानिया यांनी ठामपणे सांगितले.
"असा मंत्री कधीच व्हायला नको"
अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट हल्लाबोल करत म्हटले की, "मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यासारखे दाखवून भ्रष्टाचार करणारा मंत्री महाराष्ट्राला नको. खोटं बोलून, खोटे कागद तयार करून जर धनंजय मुंडे असा भ्रष्टाचार करत असतील, तर ते कोणत्याही मंत्रिपदावर बसण्याच्या लायकीचे नाहीत."
त्यांनी पुढे सांगितले की, "आता मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. कारण जर कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय नसताना तो कागदोपत्री दाखवला जात असेल, तर हा स्पष्ट भ्रष्टाचार आहे. धनंजय मुंडे आणि त्यांचे समर्थक आता यावर पत्रकार परिषद घेऊन काहीही स्पष्टीकरण देतील, पण मी त्यांना सांगू इच्छिते की, जर काही सांगायचं असेल, तर पेपरनिशी बोला! मंत्रिमंडळाच्या बैठकीचे खरे निर्णय दाखवा आणि सिद्ध करा की मी चुकीचं बोलत आहे."
अंजली दमानिया यांच्या या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. धनंजय मुंडे यांच्याकडून किंवा सरकारकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया येणे अद्याप बाकी आहे. मात्र, या प्रकरणामुळे विरोधकांना सरकारवर टीका करण्यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे. आता हे पाहावे लागेल की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या आरोपांची दखल घेतात का, आणि या प्रकरणाचा पुढे काय परिणाम होतो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा