दिल्लीतून टीप मिळाली, पुण्याच्या इंटलिजन्सचा छापा, घरातलं दृष्य पाहून पोलीसही धक्क्यात...
दिमोटे, प्रतिनिधीसंगमनेर : दिल्लीच्या गुप्तचर विभागाने पुण्याच्या गुप्तचर विभागाला एक माहिती दिली, या माहितीनंतर पुण्याच्या गुप्तचर विभागाने संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरातील एका घरावर छापा टाकला.
छापा टाकल्यानंतर गुप्तचर विभागाला समोर जे दिसलं ते पाहून त्यांचेही डोळे चक्रावले. या घरामध्ये बनावट नोटा छापल्या जात होत्या. पुण्याच्या गुप्तचर विभागाने या घरातून नोटा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर कागद आणि चलनातील बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
संगमनेर शहराजवळ असलेल्या गुंजाळवाडी परिसरातील एका घरात बनावट नोटा छापल्या जात असल्याची माहिती दिल्लीच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती. ही माहिती त्यांनी पुणे विभागाला दिली, त्यानंतर पुण्याच्या टीमने छापा टाकला असता त्यांना नोटा बनवण्याचे कागद, प्रिंटर आणि इतर साहित्य आढळून आले.
संगमनेर शहरात बनावट नोटा छापणारा रजनीकांत रहाणे या आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. रजनीकांतने या नोटा छापून कुठे चलनात आणल्या? यासाठीचे कागद त्याने कुठून आणले? याची चौकशी पोलीस करत आहेत.
नागपूरमध्ये बनावट नोटांचा कारखाना
काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्येही बनावट नोटांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती. नागपूरच्या जरीपटका भागात बनावट नोटा बनवण्याचा कारखाना सुरू होता, या कारखान्यातून देशभरात कोट्यवधींच्या बनावट नोटा पाठवल्या गेल्या. याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी नागपूरमधून मलकीत सिंग गुरमेश सिंग विर्क आणि मनप्रीतसिंग कुलविंदरसिंग विर्क या दोन मुख्य सूत्रधारांना अटक केली, तसंच टोळीतील 4 जणांनाही बेड्या ठोकल्या.
झटपट पैसे कमावून श्रीमंत होण्यासाठी मलकितसिंग विर्क आणि मनप्रीतसिंग विर्क यांनी बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला. कारखान्यातून त्यांनी 200 आणि 500 रुपयांच्या नोटा छापल्या. 1 लाख रुपयांच्या खोट्या नोटा छापण्यासाठी विर्क बंधू 20 ते 30 हजार रुपये घेत होते.
नागपूरच्या कारखान्यातून पोलिसांनी 2 लाखांच्या बनावट नोटा, तीन लेझर प्रिंटर, 200 आणि 500 च्या नोटा छापण्यासाठी ए-4 साईजचे 85 जीएसएम पेपर, दोन लॅमिनेशन मशीन, आरबीआयची सिक्युरिटी स्ट्रीप, लॅपटॉप जप्त केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा