पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी कोण? फडणवीस थेट नाव घेत म्हणाले, '2029 मध्ये...'
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मागील आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षी वयाची 75 वर्ष पूर्ण केल्यानंतर निवृत्त होतील असं भाकित केलं होतं.
तसेच त्यांनी सूचक पद्धतीने विधान करताना महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केंद्रात संधी मिळेल म्हणताना ते मोदींचे उत्तराधिकारी असतील असं सांगण्याचा प्रयत्न केलेला. यावरुन त्यावेळी फडणवीसांनी आपलं मत नोंदवलं होतं. आता मुंबईमधील वांद्रे कुर्ला कॉम्पेक्समधील 'इंडिया ग्लोबल फोरम'च्या कार्यक्रमात फडणवीसांनी भावी पंतप्रधान कोण असेल याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
राऊत काय म्हणालेले?
संजय राऊत यांनी 31 मार्च रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना, "मोदींचा वारसदार संघ ठरवेल असं दिसत आहे. संघाची चर्चा बंद दाराआड असते. बंद दाराआड झालेली चर्चा बाहेर येत नाही. पण काही संकेत स्पष्ट असतात. संघ पुढील नेता ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल," अशी शक्यता राऊतांनी व्यक्त केली.
फडणवीसांचं राऊतांना उत्तर
संजय राऊतांनी नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून तुमचं नाव घेतल्यासंबंधी विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल रोजी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया नोंदवलेली. "नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही. नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत. अजून बरीच वर्षं नरेंद्र मोदी काम करणार आहेत. आमचा सर्वांचा आग्रह आहे. आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहत आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही". पुढे ते म्हणाले की, "भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो. ही मुघली संस्कृती आहे. तिथे वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचे विचार करतात. सध्या कोणताही उत्तराधिकारी निवडण्याचा प्रश्न नाही," असं म्हणत फडणवीसांना पंतप्रधान मोदी पितृतूल्य असल्याचं म्हटलं होतं.
फडणवीस यांनी आज म्हणजेच 8 एप्रिल रोजी मुंबईतील बीकेसीमधील 'इंडिया ग्लोबल फोरम' कार्यक्रमामध्ये 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीचा उल्लेख केला आहे. 2029 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे. "2029 मध्ये मोदी पंतप्रधान होणार असल्याने त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल विचार करण्याची ही योग्य वेळ नाही," असं फडणवीस म्हणाले. ते पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल याबद्दल बोलत होते.
फडणवीसांनी वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही असं म्हणत लगावलेल्या टोल्यावरुन राऊतांनी, "फडणवीस काय म्हणाले होते, बाप जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही. कोण बाप? कोणाचा बाप? देशाला बाप नाहीये. मोदी हे पंतप्रधान आहेत. ही एक तात्पुरती व्यवस्था असते," असं म्हटलं होतं. तसेच मोदींच्या उत्ताराधिकाऱ्यावरुन प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी, "हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत. हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात नाही. 2019 ला फडणवीस यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात पराभव झाला. 2024 ला मोदी लोकसभेत बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत. स्वतः नरेंद्र मोदी यांनी पक्षाला 75 वर्षाचा नियम केलाय. हा नियम लालकृषण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना लागू होता. सप्टेंबर महिन्यात मोदी 75 वर्षाचे होत आहेत म्हणून त्यांना नियमाने निवृत्त व्हावं लागणार आहे," असा उल्लेखही राऊतांनी केलेला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा