तुरुंगात असूनही कराडच्या गँगची दहशत संपेना, पोलिस अधिकाऱ्याच्या खुलाशाने खळबळ....


तुळजाई न्युज, बीड प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यात घडलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडविरोधात अनेक नवे खुलासे समोर येत आहेत. तुरुंगात असतानाही त्याच्या गटाचे वर्चस्व आणि दहशत कायम असल्याचा दावा एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने केला आहे.

मस्साजोग गावाचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरणानंतर झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी वाल्मिक कराड  आणि त्याच्या गँगवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. याच प्रकरणात राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले होते. सीआयडी आणि एसआयटीने संयुक्त तपासादरम्यान बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांचा जबाब 23 फेब्रुवारी 2025 रोजी नोंदवला होता, ज्यामधील माहिती आता उघड झाली आहे.

गोल्डे यांनी त्यांच्या जबाबात असे सांगितले की, वाल्मिक कराड हा अतिशय धोकादायक गुन्हेगार असूनही बीड पोलिसांकडून त्याला खास संरक्षण दिले जात होते. त्याच्या सुरक्षेसाठी 18 अंमलदार आणि दोन आरसीपी प्लाटून तैनात करण्यात आले होते. 22 जानेवारीला न्यायालयात हजर करताना 6 अधिकारी, 33 पुरुष आणि 6 महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. 31 डिसेंबर 2024 रोजी वाल्मिक कराड याने पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमर्पण केले होते. प्रथम त्याला खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती, पण नंतर त्याच्यावर संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

विश्वांभर गोल्डे यांनी केलेल्या या खुलाशामुळे बीड पोलिस दल नव्या वादात सापडले आहे. कराड तुरुंगात असूनही त्याच्या समर्थकांकडून जिल्ह्यात दहशत कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, देशमुख कुटुंबीयांच्या घराजवळ रत्नागिरी जिल्ह्यातून आलेली एक अनोळखी महिला अचानक दिसून आली होती. तिने कृष्णा आंधळे या मारेकऱ्याबाबत पुरावे असल्याचा दावा करत एक रात्र देशमुख यांच्या घराबाहेरच्या मंडपात काढली. इतकंच नाही तर या महिलेने देशमुख यांच्या घरातील बाथरूममध्ये आंघोळ करण्याचा हट्ट धरल्याने देशमुख कुटुंबीय हैराण झाले. तिचा नेमका हेतू आणि ओळख अद्यापही समजलेली नाही. सध्या बीड पोलिसांकडून त्या महिलेची माहिती गोळा केली जात आहे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

इमेज

पुणे जिल्ह्यातील काळेवाडी नगरात "एक गाव एक मिरवणुक" काढून एक आदर्श निर्माण करुन दिला....