घनसावंगी तालुक्यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी व अमानुष पणे हल्ला....

जालना : घनसावंगी तालुक्यात शेतवस्तीवर शनिवारी मध्यरात्री सुमारास भीषण चोरी आणि अमानुष हल्ला झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबनभाई बापूजी पठाण व त्यांची पत्नी सलीमा पठाण या दाम्पत्यावर ३ ते ४ अज्ञात चोरट्यांनी अचानक हल्ला चढवून गंभीर जखमी केले. विशेष म्हणजे, चोरट्यांनी महिलेची तीन बोटे धारदार शस्त्राने तोडल्याची धक्कादायक घटना घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथे घडली आहे.

दिनांक ३ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बिबनभाई पठाण आणि सलीमाबी पठाण आपल्या शेतातील वस्तीवर घराच्या अंगणात झोपले असताना, हिंदी भाषेत बोलणारे दोन अज्ञात इसम त्यांच्या वस्तीवर आले. त्यांनी काठी आणि इतर धारदार हत्यारांनी दोघांवर अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात सलीमाबी पठाण यांच्या गळ्यातील सोन्याचे पोत, कानातील दागिने, पायातील चेन व नगदी रक्कम मिळून अंदाजे एक लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला.
हल्ल्यानंतर दोघेही बेशुद्ध अवस्थेत शेतात पडलेले आढळून आले. सकाळी सुमारे नऊ वाजता स्थानिकांनी त्यांना पाहिले आणि तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. प्राथमिक उपचारासाठी दोघांना घनसावंगी येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जालना येथे आणि नंतर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अशी माहिती पोउपनी प्रतिभा पठाडे यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे, जमादार नारायण माळी आणि भगवान शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गतीमान तपास सुरू केला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. काही तासानंतर घटनास्थळी अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, सपोनि साजीद अहेमद यांनी भेट दिली.
   या अमानुष हल्ल्यामुळे खापरदेव हिवरा व आसपासच्या भागात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट