कोकण, मध्य महाराष्ट्रावर पावसाचं संकट, पुढील २-३ दिवस अतिवृष्टी ते अतिमुसळधार; IMDने दिला धोक्याचा इशारा...

तुळजाई न्युज :  मान्सून यंदा वेळेआधीच दाखल होणार आहे. दरम्यान, मान्सूनच्या आगमनाआधी अवकाळीने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या आठवड्याभरात वीजांच्या कडकाडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे.आता येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्रात गुरुवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे कोकणात अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता

पूर्व-मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झालीय. त्या प्रभावामुळे गुरुवारी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. हा कमी दबाचा पट्टा उत्तरेकडे सरकत असून त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सिंधुदुर्गमध्ये सलग ५ दिवस अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

मध्य महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थितीची शक्यता

मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर व कोल्हापूर परिसरात पूरजन्य परिस्थिती उद्भवू शकते. हवामान विभागाने या भागांत सतर्कतेचा इशारा दिला आहे. ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहनही हवामान विभागाने केलंय.

विदर्भात तुलनेने कमी पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ विभागात पावसाचा जोर कमी राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. मात्र नैऋत्य मोसमी वाऱ्यांची स्थिती अनुकूल आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत केरळसह दक्षिण भारतात वारे दाखल होतील. बंगालच्या उपसागरातही मान्सूनची प्रगती होईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

वादळी वारा आणि पावसामुळे समुद्र खवळला आहे. अशा परिस्थितीत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागाने किनारपट्टी भागातील नागरिकांना केलंय. खोल समुद्रात गेलेल्या अनेक मासेमारी बोटी किनाऱ्याला परत येत आहेत.

शेतीच्या कामांवर परिणाम

राज्यात काही ठिकाणी अवकाळीने प्रचंड झोडपलं आहे. या पावसामुळे पेरणीआधी मशागतीच्या कामावर परिणाम झाला आहे. त्यातच येत्या आठवड्याभरात मुसळधार पावसाचा अंदाज असून यामुळे खरीप हंगामाच्या तयारीतही अडथळे येण्याची शक्यता आहे. कोकण व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट