बच्चू कडूंना दिलासा! अमरावती बँक अध्यक्षपद अपात्रतेच्या निर्णयाला न्यायालयाची स्थगिती...
तुळजाई न्युज : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडूयांना (Bacchu Kadu) मोठा दिलासा मिळाला आहे. बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Amravati News) अध्यक्षपदावरुन अपात्र ठरवण्यात आले होते.
कडू यांना एक वर्षाची शिक्षा झाल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. यासंबंधीच्या विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने (Nagpur High Court) स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता बच्चू कडू यांचं अध्यक्ष आणि संचालकपद कायम राहणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
अमरावती जिल्हा बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह 11 संचालकांनी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका दाखल केली होती. नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांना एका प्रकरणात एका वर्षाची शिक्षा ठोठावली असल्याचा दाखला त्यांनी यामध्ये दिला होता. याचा आधार घेत विभागीय सहनिबंधक यांनी आपणास अपात्र का करण्यात येऊ नये, तसेच पुढील पाच वर्षांसाठी आपणास सदरचे पद धारण करण्यास अपात्र का करू नये? अशी नोटीस बच्चू कडू यांना बजावण्यात आली होती. 24 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता साक्ष नोंदविण्याकरिता समक्ष अथवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करावे, असे नोटिसीत नमूद करण्यात आले होते.
2017 साली नाशिकच्या सरकारवाडी पोलीस ठाण्यात बच्चू कडू यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. नाशिकच्या विशेष न्यायालयाने 2021 मध्ये बच्चू कडू यांना एक वर्षापर्यंत कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला बच्चू कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
याच प्रकरणाचा दाखला देत विरोधी गटातील संचालकांनी बच्चू कडू यांना संचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती. बच्चू कडू यांना पंधरा दिवसात त्यांचं म्हणणं मांडण्याचे आदेशही त्यावेळी देण्यात आले होते. अशातच आता या प्रकरणाचा दाखला देत न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत बच्चू कडू यांना अपात्र करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा