पानेवाडी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निकृष्ट कामांचा घाट? नागरिकांमध्ये संतापाची लाट. पानेवाडीत विकासाच्या नावाखाली जनतेची हेळसांड....




तुळजाई  न्युज  पानेवाडी (प्रतिनिधी): 

पानेवाडीत विकासाच्या नावाखाली जनतेची हेळसांड; पेव्हर ब्लॉक उखडले, पण सिमेंट रस्त्याचा पत्ता नाही!

ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निकृष्ट कामांचा घाट? नागरिकांमध्ये संतापाची लाट.

घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी  येथील मोहिते गल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. भूमिगत नालीच्या कामासाठी सुस्थितीत असलेले पेव्हर ब्लॉक उखडून टाकण्यात आले, मात्र महिना उलटूनही रस्ता पूर्ववत न केल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेमका प्रकार काय?

दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी या गल्लीत भूमिगत नालीचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी येथील जुने पेव्हर ब्लॉक काढून रस्ता खोदण्यात आला. "येथे लवकरच दर्जेदार सिमेंट रस्ता करण्यात येईल," असे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, नालीचे काम पूर्ण होऊन बराच काळ लोटला तरी रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. सध्या रस्त्यावर केवळ धूळ, दगड-गोटे आणि चिखलाचे साम्राज्य असून, वृद्ध व बालकांना चालणेही कठीण झाले आहे.

निकृष्ट कामांची परंपरा आणि प्रशासकीय दुर्लक्ष:

पानेवाडीत यापूर्वीही अनेक विकासकामे निकृष्ट दर्जाची झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. आताही ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपायला अवघे ८ ते १० दिवस उरले असताना, घाईघाईत कामे उरकून कंत्राटदाराची बिले काढण्याचा हा प्रकार तर नाही ना? असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. चांगल्या दर्जाचे पेव्हर ब्लॉक उखडून जनतेच्या पैशाचा अपव्यय का केला? असा सवाल  ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

आंदोलनाचा इशारा:

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिसरात आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले असून अपघाताची भीती वाढली आहे. जर पुढील दोन-तीन दिवसांत सिमेंट रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद जालना येथे या निकृष्ट कामांच्या चौकशीसाठी तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा पानेवाडीतील संतप्त नागरिकांनी दिला आहे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

इमेज

पुणे जिल्ह्यातील काळेवाडी नगरात "एक गाव एक मिरवणुक" काढून एक आदर्श निर्माण करुन दिला....