जालन्यात 'रो हाऊस विक्री'च्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; ५ पीडित महिलांची सुटका...

 जालन्यात 'रो हाऊस विक्री'च्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; ५ पीडित महिलांची सुटका



तुळजाई न्युज जालना:

जालना शहरात 'रो हाऊस विक्री करणे आहे' असा बोर्ड लावून त्याआड वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून कारवाई करण्याऐवजी थेट छापा टाकला असता, तिथे सुरू असलेला हा गोरखधंदा समोर आला. या कारवाईत पोलिसांनी पाच पीडित महिलांची सुटका केली असून, एका दलालासह ग्राहकाला ताब्यात घेतले आहे.

शहरातील मंठा-अंबड बायपास मार्गालगत असलेल्या परिनिका रुग्णालयाच्या मागील बाजूस ही कारवाई करण्यात आली. या परिसरातील एका विरळ वस्तीमध्ये 'राजुरेश्वर कन्स्ट्रक्शन' या नावाने एक रो हाऊस आहे. या रो हाऊसच्या बाहेर 'रो हाऊस विकणे आहे' असा फलक लावण्यात आला होता. मात्र, या फलकाच्या आडून आतमध्ये अनैतिक देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

प्रताप लहाने हा व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी येथे वेश्याव्यवसाय चालवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सहसा वापरल्या जाणाऱ्या बनावट ग्राहकाच्या पद्धतीचा अवलंब न करता, थेट घटनास्थळी छापा टाकला.

पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात दलाल प्रताप लहाने आणि मनोज सातभाये नावाचा ग्राहक आढळून आले. तसेच, तेथे पाच महिला देखील उपस्थित होत्या. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, सुरुवातीला संशयितांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. "आम्ही हे रो हाऊस विक्रीसाठी ठेवले असून, या महिला घर पाहण्यासाठी आणि व्यवहारासाठी आल्या आहेत," अशी बतावणी त्यांनी केली. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केली असता सत्य परिस्थिती समोर आली आणि त्यांचा बनाव फसला.

पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले की, या ठिकाणी ग्राहकांकडून २ हजार ते ५ हजार रुपये आकारले जात होते. मिळणारी रक्कम पीडित महिला आणि मुख्य सूत्रधार यांच्यात वाटून घेतली जात असे. घटनास्थळावरून पोलिसांनी रोख २३ हजार रुपये जप्त केले आहेत.

या प्रकरणी जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईनंतर संबंधित महिलांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. "आमच्या महिला तशा नाहीत," असे म्हणत त्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कडक भूमिका घेत कायदेशीर कारवाई सुरू ठेवली आणि संबंधितांना पोलीस ठाण्यातून बाहेर काढले. यावर नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्याचा पवित्रा घेतला होता.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

इमेज

पुणे जिल्ह्यातील काळेवाडी नगरात "एक गाव एक मिरवणुक" काढून एक आदर्श निर्माण करुन दिला....