अंतरवाली दाई ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात १५ सप्टेंबरपासून शेतात आमरण उपोषणाचा इशारा; गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले

 



घनसावंगी / प्रतिनिधी- मौजे अंतरवाली दाई (ता. घनसावंगी, जि. जालना) ग्रामपंचायत अंतर्गत विविध शासकीय योजनांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, माहिती अधिकारात मागितलेली माहिती न दिल्यास व संबंधितांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास येत्या १५ सप्टेंबरपासून स्वतःच्या शेतात आमरण उपोषण करण्याचा इशारा स्थानिक शेतकरी व तक्रारदार लक्ष्मण कारभारी खरात यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी घनसावंगीचे गट विकास अधिकारी (बीडीओ) यांना लेखी निवेदन सादर केले आहे.

अंतरवाली दाई ग्रामपंचायतीच्या निवेदनात नमूद केल्यानुसार, विविध योजनांमधील कामांत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे.



याविषयी वेळोवेळी तक्रारी अर्ज सादर करण्यात आले होते. तक्रारींचा पाठपुरावा केल्यामुळे तक्रारदाराच्या मालकीची गट क्रमांक २१ मधील शेतजमीन संबंधितांकडून पडीक पाडण्यात आल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

या प्रकरणाची दखल घेत विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडून १ जुलै रोजी पत्र काढण्यात आले होते. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी माहिती अधिकारांतर्गत माहिती मिळण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. मात्र, आजवर प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नाही.

अथवा संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन माहिती उपलब्ध करावी व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा १५ सप्टेंबर रोजी गट क्र. २१ मधील शेतजमिनीमध्ये आमरण उपोषण छेडण्यात येईल. या आंदोलनादरम्यान जिवितास काही हानी पोहोचल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा लक्ष्मण खरात यांनी दिला आहे.

सदर निवेदनाची प्रत घनसावंगी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनाही पुढील माहिती व कारवाईसाठी सादर करण्यात आली आहे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट