नाशिकच्या यशस्वी कारकिर्दीनंतर आशिमा मित्तल जालना जिल्हाधिकारीपदी रुजू झाल्या.....
तुळजाई न्युज जालना :
महाराष्ट्रातील युवा आणि प्रभावशाली प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेल्या आशिमा मित्तल यांनी आज जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला. यापूर्वी त्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर कार्यरत होत्या. त्यांनी पदभार स्वीकारताच, जिल्ह्यातील प्रशासन, विकास योजना आणि सामाजिक न्यायाबाबत आपला ठाम दृष्टिकोन मांडला.
मूळच्या राजस्थानातील जयपूर येथील रहिवासी असलेल्या मित्तल यांनी आयआयटी मुंबईमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. पूर्ण केल्यानंतर ‘शंकर दयाल शर्मा सुवर्ण पदक’ प्राप्त करत उत्कृष्टता सिध्द केली. त्यानंतर त्यांनी मानववंशशास्त्र (Anthropology) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. 2017 साली त्यांनी युपीएससी परीक्षेत देशात १२वा क्रमांक पटकावत भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवला. 2018 मध्ये त्या महाराष्ट्र कॅडरमध्ये रुजू झाल्या.
तसेच, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानात नाशिक जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. या कामगिरीसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने आशिमा मित्तल यांचा गौरव केला. याशिवाय, भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाण कल्याणकानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचा पहिला क्रमांक आल्याने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
2025 मध्ये मुख्यमंत्री कार्यालयाच्या 100 दिवस सुधारणा उपक्रमात नाशिक जिल्हा परिषद राज्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिला, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बालहक्क आयोगाच्या वतीने 2023 व 2024 साली सलग दोन वर्ष बालस्नेही पुरस्काराने गौरव करण्यात आले.
नाशिक जिल्हा परिषदेत कार्यरत असताना त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली. ‘सुपर 50’ उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील SC, ST, दिव्यांग आणि खुल्या गटातील 200 विद्यार्थ्यांना JEE/CET/NEET परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षणाची सुविधा देण्यात आली. यातील अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवत IIT प्रवेशाच्या दिशेने पावले टाकली.
विशेष म्हणजे, त्यांनी अंगणवाड्यांच्या वीज जोडणीसाठी विशेष मोहिमेचे नेतृत्व केले. नाशिक जिल्ह्यातील 3030 अंगणवाड्यांना वीज जोडणी मिळवून दिल्याने त्यांच्या या प्रयत्नाचा आदर्श घेऊन आता इतर जिल्ह्यांमध्येही योजना राबविण्यात येणार आहे.
तांत्रिक शिक्षण, सामाजिक जाणिवा आणि मजबूत प्रशासकीय कौशल्य यांच्या त्रिवेणीने समृद्ध असलेल्या आशिमा मित्तल यांचा अनुभव आणि कार्यशैली जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाची ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “माझा प्रशासनाचा दृष्टिकोन केवळ कामगिरीवर आधारित नसून, तो सामाजिक बदलांशी जोडलेला आहे. जालना जिल्ह्यात देखील मला शिक्षण, बालविकास, आरोग्य आणि सामाजिक समावेश या बाबतीत परिणामकारक आणि दीर्घकालीन काम करायचे आहे.”

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा