मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय मुंबईतून परतणार नाही......

 



तुळजाई न्युज बीड : ''मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली न लागल्यास यावेळी इतिहास घडवणार. आता मागे फिरायचे नाही. मुंबई आमची आहे, राज्य आमचे आहे आणि हक्काचे आरक्षणही आमचेच आहे. सरकारने कितीही अडथळे आणले, पोलिसांनी कितीही ताकद लावली तरी मुंबईला जाणारच.आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही,'' असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज व्यक्त दिला.

अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथून २७ ऑगस्टला निघणार आणि २९ ऑगस्टला मुंबई गाठणार. गणपती बाप्पाला सोबत घेऊन लढाईला पूर्णविराम देऊ. मुंबईत मराठ्यांना येऊ द्यायचे नाही, म्हणून काहींचे षडयंत्र सुरू आहे. पण आपण गणपतीची मूर्ती घेऊन मुंबईत घुसणारच. समाज शांततेने आंदोलन करणार आहे. उद्रेक, दगडफेक, जाळपोळ, तोडफोड मान्य नाही. असे करणारे आपले नाहीत. असे करणाऱ्यांना लगेच पकडून पोलिसांच्या हवाली करा. आंदोलनाचा उद्देश फक्त हक्काचे आरक्षण हा आहे''.

जरांगे यांनी २९ ऑगस्टला मुंबईत जाण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहेत. त्यानुसार त्यांनी ठिकठिकाणी दौरे करून तसे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर मांजरसुंबा (ता. बीड) येथे आज त्यांनी अंतिम इशारा सभा घेतली. या सभेला मोठी गर्दी होती. जरांगे म्हणाले,''आपली ताकद मोठी आहे. ज्यांना आमच्याबद्दल विचारही करायचा नाही, त्यांच्यासाठी लेकरांचे नुकसान होऊ देऊ नका. आम्ही शांततेत लढतोय, आमच्या मुलांना विनाकारण डिवचू नका. आम्ही पोलिसांना कधीही त्रास दिला नाही, पण दबाखाली आमचे आंदोलन तोडायचा प्रयत्न केलात तर तो तुमच्याच गळ्यात पडेल.

... तर राज्य बंद करू


''मराठा- ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण आम्ही ते होऊ देणार नाही. आमचा लढा जातिवादासाठी नाही, हक्कासाठी आहे. हिंदू संस्कृती, वारकरी परंपरा जपत आम्ही हे आंदोलन करतोय. आम्ही आरक्षणाशिवाय माघार घेणार नाही. आरक्षण मिळाले नाही तर भाजप आमदारांना गावात फिरू देणार नाही. मुंबईत त्रास दिला तर राज्य बंद करू,'' असा इशारा जरांगे यांनी दिला.


तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे


''समाजात हुशार मुले आहेत, पण आरक्षण नसल्याने त्यांचे वाटोळे होतेय. आपल्याला मुलाबाळांचे भविष्य घडवायचे आहे. आपल्याला फक्त राजकारणात नाही तर शिक्षण, नोकरीत समाजाला वर न्यायचे आहे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे,'' असा सल्लाही जरांगे यांनी दिला.


मंत्री, नेत्यांना आवाहन


जरांगे म्हणाले,''मुख्यमंत्र्यांनी २९ जातींना ओबीसीत घेतले, मग मराठा समाजाला का डावलले? हैद्राबाद गॅझेट लागू का करत नाहीत? कुणबी नोंदी सापडल्या तरी अंमलबजावणी होत नाही. मराठ्यांचा प्रश्न सुटला तर त्यांचा खोटा राजकीय डाव उघड होईल, अशी भीती सरकारला आहे.'' मंत्री, नेत्यांनीही आपल्या जातीसाठी एक व्हावे, राजकारणाचा विचार करू नये, असे आवाहन त्यांनी केले. नेत्यांसह डॉक्टर, वकील, शिक्षकांनीही मुंबईसाठी आपली वाहने बाहेर काढावीत, असेही जरांगे म्हणाले.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

इमेज

पुणे जिल्ह्यातील काळेवाडी नगरात "एक गाव एक मिरवणुक" काढून एक आदर्श निर्माण करुन दिला....