जलसंवर्धनाचा संदेश देत सोमठाण्यात युवा जल दिंडी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला....
जलसंवर्धनाचा संदेश देत सोमठाण्यात युवा जल दिंडी अभियानाचा शुभारंभ.
तुळजाई न्युज : जालना, दि. १ जून २०२६ : माय भारत जालना, यशदा, युनिसेफ आणि पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमठाणा येथे युवा जल दिंडी अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. जलसंवर्धन, जलसाक्षरता आणि पाणी बचतीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे अभियान दि. १ ते 5 जून २०२६ या कालावधीत बदनापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. सदरील अभियानाचे आयोजन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षसंवर्धनाचा संदेश देत वृक्षाला जलदान करून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोमठाणा गावाच्या सरपंच स्वाती नागवे, मयूरकुमार गोरमे जिल्हा युवा अधिकारी माय भारत जालना, सामाजिक कार्यकर्ते संतोष नागवे, उपसरपंच दिलीप मेंढरे, उपकृषी अधिकारी उमेश भोसले, उपकृषी अधिकारी गोपालदास जुंझारे, कृषी सहाय्यक अधिकारी रुपाली भोसले, जलसंधारण विभागाचे जिल्हा संसाधन व्यक्ती मनोहर सरोदे, प्रा. अमृत तारो तसेच डॉ. रामदास निहाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उपस्थित मान्यवरांचा तुळशीचे रोप भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि जलव्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पाण्याचे वाढते संकट, भूजल पातळीतील घट आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर युवकांनी जलसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
त्यानंतर जल दिंडीची सुरुवात गावातील शहीद सुरेश कदम यांच्या स्मारकाला अभिवादन करून करण्यात आली. जल दिंडीमध्ये सहभागी झालेल्या युवक-युवतींनी आणि विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाबाबत विविध घोषणा देत गावातून जनजागृती रॅली काढली. "पाणी अडवा, पाणी जिरवा" "प्रत्येक थेंब अमूल्य आहे" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. रॅलीदरम्यान ग्रामस्थांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच जलस्रोतांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच या अभियानासाठी सहारा सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष बिस्मिल्ला सय्यद, तेजस जनविकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजी तायडे तसेच युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले. विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक आणि युवकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला अधिक प्रभावी स्वरूप प्राप्त झाले. यावेळी डॉ. हटकर, प्रा. मापारी सर, राम शेळके, शीतल वाघ, अर्चना जमदाडे तसेच पाथ्रीकर कॅम्पसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ग्रामस्थांचा प्रतिसाद यामुळे अभियानाच्या पहिल्याच दिवशी जलसंवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.
संपूर्ण आठवडाभर चालणाऱ्या या युवा जल दिंडी अभियानामध्ये रॅली, जनजागृती कार्यक्रम, शपथविधी, स्वच्छता उपक्रम, वृक्षारोपण आणि विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून जलसाक्षरतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा